Document Registration Pudhari
पुणे

Aadhaar Verification for Property Registration: दस्तनोंदणीसाठी आधार पडताळणी बंधनकारक; ओळखदार देण्याचा पर्याय बंद

आयसारिता १.९ प्रणालीत नवी सुविधा लागू; अंगठ्याचा ठसा, बुबुळ स्कॅनिंग आणि चेहरा पडताळणीचे पर्याय उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दस्तनोंदणी प्रक्रियेत बनावट व्यक्तींचा वापर करून होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आधार पडताळणी बंधनकारक केले आहे. आयसारिता १.९ प्रणालीतील ऑनलाइन पडताळणी सुविधा बुधवारपासून (दि. ४) राज्यभर लागू करण्यात आली. यापुढे नोंदणी प्रक्रियेत सहभागी सर्व संबंधित व्यक्तींचे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्याऐवजी ओळखदार देण्याचा पर्याय बंद करण्यात आला आहे.

आधार पडताळणीसाठी यापूर्वी अंगठ्याच्या ठशांचा वापर होत होता. मात्र, ठसे जुळण्यात अडचण आल्यास बुबुळांच्या स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध आहे. नव्या प्रक्रियेत अधिकृत आधार अ‍ॅपच्या माध्यमातून चेहरा पडताळणीचाही पर्याय देण्यात आला आहे. यामुळे विशेषतः ठशांद्वारे पडताळणी करताना अडचण येणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्ग मिळेल.

या सुविधेसाठी नागरिकांकडे अँड्रॉइड ९ किंवा त्यापुढील, अथवा आयओएस १६ किंवा त्यापुढील आवृत्तीचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा आणि कार्यरत कॅमेरा असावा. अधिकृत आधार अ‍ॅपमध्ये आधार क्रमांकाद्वारे नोंदणी, सिम पडताळणी आणि चेहरा पडताळणी आधीच पूर्ण केलेली असावी. अ‍ॅपमध्ये नोंदणीकृत सहा अंकी संकेतांकाने प्रवेश करता येणेही गरजेचे आहे. आधारचे बायोमेट्रिक तपशील बंदिस्त असल्यास आवश्यकतेनुसार ते सुरू करून घ्यावेत.

नोंदणीवेळी विलंब टाळण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात येण्यापूर्वीच अ‍ॅप उतरवून त्यातील नोंदणी पूर्ण करावी, मोबाईल पुरेसा भारित ठेवावा आणि इंटरनेट सुविधा तपासावी. पडताळणीच्या वेळी संबंधित आधारधारकाने स्वतःचा मोबाईल घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक संमती घेण्याच्या सूचनाही कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

चार टप्प्यांत पडताळणी

दस्तनोंदणी कार्यालयातील संगणकावर प्रथम संकेतचिन्ह तयार होईल. नागरिकाने ते आधार अ‍ॅपमधून चित्रित केल्यानंतर संमती देऊन चेहरा पडताळणी पूर्ण करायची आहे. पडताळणीचा निकाल कार्यालयातील संगणकावर तत्काळ दिसेल. ती यशस्वी झाल्यानंतर दस्तनोंदणीची प्रक्रिया करता येईल.

तिन्ही पडताळणी प्रक्रिया नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकाची आधार पडताळणी न करता नोंदणी करण्याची वेळ येणार नाही.
अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT