पुणे

शहरातील पब व रूफ टॉप हॉटेलचे होणार सर्वेक्षण; मुख्य अभियंत्यांची माहिती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पब, रूफ टॉप आणि साइड मार्जिनमधील रेस्टॉरंट, बारचे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. तसेच, मिळकतकर विभागामार्फतही जागेत बदलासंदर्भातील पडताळणी करण्यात येणार आहे. कल्याणीनगर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल (रेस्टॉरंट) आणि पबच्या बांधकामांची पाहणी केली. या ठिकाणी मंजूर नकाशात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने ज्या रेस्टॉरंट, पबमध्ये दारू घेतली होती, अशा या दोन्ही ठिकाणांची पाहणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी केली. या ठिकाणी मूळ नकाशाप्रमाणेच बांधकाम असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे रूफ टॉप आणि साइड मार्जिनमध्ये चालविल्या जाणार्‍या रेस्टॉरंट, हॉटेल व पबचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाकडून सातत्याने अशा ठिकाणी कारवाई केली जाते. परंतु, मालकाकडून पुन्हा त्या ठिकाणी शेड उभारून व्यवसाय सुरू केला जातो, परंतु सर्वेक्षण करून पुन्हा एकदा नोटीस दिली जाणार आहे. अनधिकृत बांधकाम उतरविले जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

संबंधित विभागांना माहिती देणार

महापालिकेकडून रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली जात नाही. या व्यवसायाला परवानगी दिली जाणार्‍या अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, पोलिस यांना बेकायदेशीर बांधकाम असलेल्या ठिकाणी परवाना दिला जाऊ नये, असे पत्र दिले जाणार आहे. त्याबाबतची माहिती कळविली जाणार आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या कारवाईनंतर पुन्हा तेथे व्यवसाय सुरू करण्यास प्रतिबंध लागू शकतो, असेही वाघमारे यांनी नमूद केले.

जागेतील वापराची पुनर्तपासणी

मिळकतकर विभागाकडूनही रूफ टॉप, साइड मार्जिनमध्ये चालविल्या जाणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आदी व्यवसाय चालविल्या जाणार्‍या मिळकतींची माहिती गोळा केली जाणार आहे. जागेच्या वापरात बदल केलेला आढळून आल्यास संबंधितांकडून तिप्पट दंड वसूल केला जाईल, असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT