उघड्यावर कामकाज करण्याची पोलिसांवर वेळ! वाघोली पोलिस ठाण्यातील विदारक चित्र Pudhari
पुणे

Wagholi Police: उघड्यावर कामकाज करण्याची पोलिसांवर वेळ! वाघोली पोलिस ठाण्यातील विदारक चित्र

इमारतीचे काम कधी सुरू होणार?

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: वाघोली पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचे पालन करीत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना येथे कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर कामकाज करावे लागत आहे.

यामुळे त्यांची कार्यक्षमता खालवत असून, मनोबलाचेही खच्चीकरण होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाघोली पोलिस ठाण्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या स्वतंत्र वाघोली पोलिस ठाण्याचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 24 रोजी केसनंद फाटा येथे करण्यात आले.

तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील नवीन सात पोलिस ठाण्यांसह वाघोली पालिस ठाण्याचे ऑनलाइन उद्घाटन या वेळी झाले होते. या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम लवकरच सुरु होईल, असे नागरिकांना वाटले होते. परंतु अद्यापही पोलिसांसह येणार्‍या तक्रारदारांना सुद्धा कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाघोली, भावडी, केसनंद, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, बकोरी ही गावे या पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पोलिस ठाण्यात अधिकार्‍यांसह एकूण 116 कर्मचारी मिळणार असल्याचा उहापोह करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात संख्या कमी आहे.

त्यामुळे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. त्यातच पोलिस ठाण्यासाठी अद्यापही इमारतीची पुर्तता झाली नसल्याने उघड्यावर कामकाज करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलिस ठाण्याच्या इमारतीचा अभाव, अपुरी जागा, विना छताखाली चालणारे कार्यालयीन कामकाजामुळे पोलिसांची कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पोलिस चौकीतूनच सुरू आहे कामकाज

पूर्वीच्या वाघोली पोलिस चौकीमधून सध्या पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू आहे. मात्र, पोलिस ठाण्याचा विस्तार पाहता सध्या ही जागा अपुरी पडत असल्याने अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बाहेर बसून कामकाज करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पोलिस ठाण्याच्या इमारतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला, तरी तो मंजूर होण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांना सध्या उपलब्ध असलेल्या अपुर्‍या जागेत कामकाज करावे लागत आहे.

वाघोली पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारीवर्ग अतिशय हलाखीच्या परिस्थितीत काम करताना दिसून येत आहेत. पोलिस कर्मचार्‍यांना बाहेर उघड्यावर कामकाज करावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने तत्काळ पोलिस ठाण्याची अवस्था सुधारणे गरजेचे आहे.
- ओंकार तुपे, उपजिल्हाप्रमुख, युवासेना (ठाकरे गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT