पुणे

पुणे : निवृत्त कर्नलही अडकला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात

अमृता चौगुले

पुणे : टास्क फ्रॉडच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्नलला तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. गेल्या 2 महिन्यांत अशा प्रकारे किमान 66 तक्रारी आल्या असून, त्यात तब्बल 20 कोटी रुपयांची सायबर चोरट्यांनी ठगवणूक केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर अशा प्रकारे पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरटे लोकांना जाळ्यात ओढून फसवणूक करीत आहेत.

याबाबत एका 71 वर्षांच्या कर्नलने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन रिव्ह्यू लिहिण्यापासून तसेच व्हिडीओला लाइक करून जादा परतावा मिळविण्याचा मेसेज आला होता. सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही पैसे जमा झाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यांना प्री-पेड टास्क स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

कर्नल यांनी चोरट्यांच्या सांगण्याप्रमाणे 18 खात्यांत 48 व्यवहारांद्वारे ते पैसे भरत गेले. आपली फसवणूक होतेय, हे लक्षात येईपर्यंत त्यांची सर्व बचत आणि सेवानिवृत्तीची जमा असलेली रक्कम गेली होती. याबाबत सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात हा सर्व प्रकार झाला असून, त्यांनी घरच्यांना याबाबत काहीही सांगितले नाही. त्यांची तक्रार येताच बँकांना संबंधित खात्यातील पैसे गोठविण्यास सांगण्यात आले आहे.

टास्क फ्रॉडच्या सायबर चोरट्यांकडून देशभरात अशा प्रकारे फसवणूक केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रकार वाढले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात गेल्या 2 महिन्यांत 45 तक्रारी आल्या आहेत.

– मीनल सुपे-पाटील,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT