पुणे

कामाची थट्टा ! ठेकेदाराचा प्रताप; पुलाच्या कामात काँक्रीटऐवजी माती

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : बहुली- एनडीए रस्त्यावरील पुलाच्या कामात सिमेंट काँक्रीटऐवजी माती टाकण्याचा प्रताप ठेकेदाराने केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्यावर पाच मोठे पूल उभारण्यात येत असून, रुंदीकरणही करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामावर प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. पाच पुलांपैकी एक प्रशस्त पूल कुडजे येथे प्रथमेश हॉटेलजवळ उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पुलाच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे.

या कामात सिमेंट काँक्रीटऐवजी माती टाकून निकृष्ट पद्धतीने काम करण्यात येत असल्याचा प्रकार स्थानिक युवकांनी उघडकीस आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या कामाची तातडीने पाहणी केली. पुलाच्या संरक्षक भिंतीच्या मध्यभागी काँक्रीटऐवजी माती टाकण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट झाले.

ठेकेदारावर कारवाई करा

बहुली -एनडीए रस्त्यावर गेल्या पंधरा-वीस वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण वाहून गेले आहे. निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत. निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी
केली आहे.

खोदकाम करताना काढण्यात आलेली माती बाजूला टाकताना ती संरक्षक भिंतीच्या आत पडली असल्याचे संबंधित ठेकेदाराच्या इंजिनिअरने सांगितले. भिंतीच्या भरावात टाकण्यात आलेली माती बाहेर काढण्यात आली असून, सिमेंट काँक्रिट टाकण्यात येत आहे.

– एन. एम. रणसिंग, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT