नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी २०२१ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी १२ कोटी ४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. हे अनुदान थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे 'शासकीय काम अन् तीन वर्षे थांब' असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, राज्याकरिता एकूण ६४ कोटी ३३ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याला सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. परंतु, शासकीय अनास्थेचा अनुभव शेतकऱ्यांना आला. जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. या पावसाने दहा तालुक्यांतील सहा हजार ९१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तब्बल ४३१ गावांमधील ११ हजार ६४७ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता.
अवकाळी पावसाने शेतीपिकांची झालेली हानी बघता त्यावेळी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करत शासनाकडे नुकसानभरपाईसाठी अनुदान मागितले होते. परंतु, तब्बल तीन वर्षांनंतर तेही लोकसभा निवडणुकीच्या ताेंडावर शासनाने शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम उपलब्ध करून दिली आहे. ही रक्कम थेट बाधितांच्या बँकखात्यात वर्ग होणार आहे. त्यामुळे शासकीय मदतीची आशा सोडून दिलेल्या बाधित शेतकऱ्यांना अखेर उशिराने का होईना न्याय मिळणार आहे.
तालुकानिहाय प्राप्त अनुदान
तालुका शेतकरी संख्या नुकसान क्षेत्र (हे) प्राप्त निधी
बागलाण ११४२ ८९०.४७ १,२०,१५,०००
कळवण ४७ ४३.२० ७,७७,६००
देवळा ६४ ६२.३३ १,१२,९४०
दिंडोरी १५२५ १११०.५५ १,९९,८३,१५०
नाशिक ४६८ २६१.४६ ४७,०४,४८०
त्र्यंबकेश्वर ३७ ८.३५ १,५०,३००
निफाड ३६८५ १८६६.७३ ३,३५,८९,८९०
सिन्नर २३२ १७९.९४ ३२,२०,९२०
चांदवड ४२१० २३५०.६० ४,२३,१०,८००
येवला २३७ १४१.५० २,५४,७००
एकूण ११,६४७ ६९१४.६६ १२,०४