मुलीचा हट्ट फळाला; सहा वर्षांनंतर विभक्त पती-पत्नी पुन्हा एकत्र

मुलीचा हट्ट फळाला; सहा वर्षांनंतर विभक्त पती-पत्नी पुन्हा एकत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजारपण ही तशी वाईट गोष्ट. मात्र, मुलीचे आजारपण दोघांच्या संसारासाठी वरदान ठरले. सहावर्षीय मुलीला डेंग्यू झाल्यानंतर तिला काही दिवस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या वेळी सहा वर्षे वेगळे राहणार्‍या दोघांनी रुग्णालयात मुक्काम ठेवला. घरी परतल्यानंतर मुलीने राहण्याचा हट्ट केल्याने आणखी काही दिवस दोघे घरी एकत्र राहिले. मुलीने मम्मी-पप्पा दोघेही हवे असल्याचे म्हटले अन् त्यानंतर दोघांनी आपापसाुतील वाद विसरत पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राज आणि सिमरन (दोघांची नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत.

दोघेही उच्चशिक्षित. आयटी क्षेत्रात कार्यरत. तो उत्तर प्रदेशचा तर ती पश्चिम बंगाल येथील. बंगळूरू येथे एका कंपनीत कामाला होते. सुरुवातीला मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी 2009 मध्ये विवाहही केला. संसार सुरळीत सुरू असताना दोघे हिंजवडी येथे स्थलांतरित झाले. दोघांना 2018 मध्ये एक मुलगी झाली. त्यानंतर राजची परदेश वारी झाली. दोघांत चारित्र्याच्या संशयावरून वाद होऊ लागले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे विभक्त राहू लागले. त्यानंतर, सिमरन हिने 2020 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडधिकार्‍यांच्या न्यायालयात त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला.

तर त्यानेही वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे अ‍ॅड. प्रणयकुमार लंजिले, अ‍ॅड. अनिकेत डांगे आणि अ‍ॅड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला. यादरम्यान, सहा वर्षे वेगळे राहणारे दोघे मुलीला डेंग्यू झाल्याने एकत्र राहिले. तिच्या भवितव्याचा विचार करत दोघांनी कायमस्वरूपी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी केलेले समुपदेशन महत्त्वाचे ठरले. त्यांचा नात्यातील सहा वर्षांचा दुरावा संपला.

कुटुंबात मुलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलीने केलेला हट्ट आणि समुपदेशनादरम्यान मुलीच्या भवितव्याबाबतची कल्पना दोघांना देण्यात आली. त्यानंतर ते आपापसातील वाद-विवाद विसरून दोघे एकत्र आले. पटवून दिल्यास अशाच प्रकारे आपापसातील वाद विसरून दाम्पत्य एकत्र येऊ शकतात.

– अ‍ॅड. प्रणयकुमार लंजिले, पतीचे वकील

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news