पुणे

पुणे : पडीक जमीन विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बनावट मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून त्याआधारे गुगल मॅपद्वारे शोधून ठेवलेल्या दुर्लक्षित पडीक जमिनीची कागदपत्रे तयार करून त्याची परस्पर विक्री करणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक 1 ने पर्दाफाश केला. याप्रकरणी पथकाने सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्पेश रमेश बोहरा (मु. रा. खामगाव, बुलडाणा), उमेश जगन्नाथ बोडके (वय 47,रा. कल्याण, ठाणे), अमोल गोविंद ब्रह्मे (58, रा. सिंहगडरोड, पुणे), सचिन दत्तात्रय जावळकर (41, रा. कोथरुड, पुणे), सय्यद तालीब हुसैन सय्यद जामीन हुसैन (43, रा. खामगाव, बुलडाणा), प्रदीप अनंत रत्नाकर (54, रा. बदलापूर, ठाणे) व मोहम्मद असिफ मोहम्मद युनुस (38, रा.खामगाव, बुलडाणा) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अंबरनाथ, पनवेल, पुणे अशा विविध ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे व पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुर्लक्षित प्रॉपर्टीवर असे लक्ष

गुन्ह्यातील संशयित आरोपी हे प्रॉपर्टी एजंट असून, ते दुर्लक्षित जमिनीची गुगल मॅपद्वारे व इतर प्रॉपर्टी एजंटकडून माहिती घेत, जमिनीचे मालक मयत असल्याचे किंवा संबंधित जमिनीकडे वर्षोनुवर्षे दुर्लक्ष असल्याची खात्री करून त्या जागेची कागदपत्रे सरकारी कार्यालयातून काढत. तसेच गुगल मॅपवर ज्या जमिनींवर जास्त झाडे वाढलेली दिसत, अशा जमिनींची ते चौकशी करायचे. या जमिनींचे मालक नसल्याची किंवा मृत झाल्याची खात्री करून ते वर्तमानपत्रात जागा विकण्यासंबंधी जाहिरात देत. त्यामध्ये कोणाची हरकत आहे का अशी विचारणा ते करत. हरकत न आल्यास ते पुढचे पाऊल उचलून बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट व्यक्ती उभा करून जमिनीचा दस्त नोंदवत.

डमी माणूस उभा करून बनावट कागदपत्रे

आरोपी सय्यद हुसैन व मोहम्मद यूनुस यांच्या मदतीने त्या जमीन मालकाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून कल्पेश बोहरा हा त्या व्यक्तीच्या नावाने बनावट माणूस बँकेत उभा करून बनावट बँक खाते उघडायचा. त्याच आधारे संशयित आरोपी पुढील पार्टीला जमिनीची विक्री करीत होते. सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1 चे अजय वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाडवी, उपनिरीक्षक विकास जाधव, अविनाश लोहाटे, अंमलदार यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, अस्लमखान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यातील वडगाव येथे दीड एकरची एक सात लाख दहा हजार रुपयांची जागा खरेदी करून त्याचे मुळशी सह. दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात खरेदीखत नोंदवले आहे. अवैध मार्गाने येणारे घुसखोर, समाजविघातक काम करणार्‍या व्यक्ती तसेच लॅण्ड माफिया यांना हवालाद्वारे पैशाचे व्यवहार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

शेतकर्‍यांनाही गंडवले

गुन्ह्यात अटक झालेला मुख्य संशयित आरोपी बोहरा हा सुरुवातीला शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा करत असे. त्याच कागदपत्रांच्या आधारे तो परस्पर कर्ज घेत असल्याचाही प्रकार तपासात समोर आला आहे. त्याची बनावट कागदपत्रे बनविण्याची सुरुवात अशाच फसवणुकीच्या कामातून घडली. त्याने अशा किती शेतकर्‍यांना गंडवले आहे, त्या दृष्टीनेही गुन्हे शाखा तपास करत आहे.

SCROLL FOR NEXT