Minor girl abused by cook
खेड : लग्नसमारंभात जेवण बनवण्यासाठी गेल्यावर आचाऱ्याने जबरदस्ती केली. त्याची माहिती घरी दिल्यावर पोलिसात तक्रार दिली; मात्र या प्रकरणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. पावसाच्या पाण्याने गढूळ होऊन वाहणाऱ्या भीमा नदीच्या प्रवाहात तिने स्वतःला झोकुन दिले. गेले तीन दिवस अल्पवयीन 'ती'चा शोध सुरू आहे. राजगुरुनगर जवळच्या चांडोली गावातील अल्पवयीन युवतीची ही करुण कहाणी समोर आली आहे. यातील आचारी आरोपीला खेड पोलिसांकडून अटक झाली आहे. परंतु तीन दिवस शोध घेऊनही तिचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफच्या पथकाकडून तिचा शोध घेतला जात आहे.
याबाबतची माहिती अशी की, केटरिंग व्यवसायात काम करताना सोबत आचारी काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तक्रार झाल्यावर तपास सुरू असताना पोलिसांना राजगुरुनगर-चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर मुलीची ओढणी व चप्पल मिळुन आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे, तसेच परिसरात पाऊस पडत असल्याने नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे तपासकार्यात अडथळे येत आहेत. सुरुवातीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यात आला; मात्र काहीच हाती लागले नाही.शुक्रवारी (दि. २३) एनडीआरएफच्या दोन पथकाकडून भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावर शोध मोहिम सुरु करण्यात आली. पीडित बहिणीच्या तक्रारीवरुन राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अद्यापही पीडितेचा तपास सुरू असल्याने पोलिसांकडून त्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पीडित तरुणीवरुन अत्याचार झाला. शिवाय तीन दिवसांनंतर शुक्रवारी दुपारी पाच वाजेपर्यंत मुलगी मिळुन न आल्याने कुटुंबियांची चिंत्ता वाढली आहे. दरम्यान, राजगुरुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची ही चौथी घटना घडली आहे.