

पुणे: मैत्रिणीने ’चहा पिण्याच्या’ निमित्ताने घरी बोलावून आपल्या मित्राच्या डोळ्यात मिरची टाकून जखमी केले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात ही घटना घडली. दरम्यान प्रकाराची माहिती मिळताच अवघ्या चार तासात कोंढवा पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. याप्रकरणी मैत्रीण, तिचा पती आणि अन्य दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.(Latest Pune News)
सोनल (35, रा. कोंढवा खुर्द), तिचा पती अतुल (38), तसेच त्याचे साथीदार रॉबीन (24, रा. कोंढवा खुर्द), सुरेश (31, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत 39 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली.
सोनल आणि फिर्यादी हे मित्र आहेत. सोनलने बुधवारी आपल्या मित्राला चहा पिण्याच्या बहाण्याने एनआयबीएम रस्ता परिसरातील घरी बोलविले. सायंकाळी ते मैत्रिणीच्या घरी गेले. घरात प्रवेश करताच सोनलने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जखमी केले. त्याचवेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या तिच्या पतीसह इतर दोन साथीदारांनी आत येऊन त्याला मारहाण केली, तोंडात बोळा कोंबला, हातपाय रस्सीने बांधले आणि खोलीत बंद केले.
त्यानंतर आरोपींनी तरुणाचा मोबाईल आणि एटीएम काढून घेत, त्याच्या मोबाईलवरून पत्नीला मेसेज पाठवून दागिने व पैसे तयार ठेवण्याची धमकी दिली. दरम्यान हा घटनेची माहिती रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना मिळाली.
तत्काळ वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांना याबाबतची माहित देऊन सहायक निरीक्षक सुकेशनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह पथकाने एन आयबीएम रस्ता भागातील घरावर छापा टाकून अपहत व्यक्तिची सुटका केली. कोंढवा पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, तसेच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.