

यवत: यवत(ता.दौंड) गावाच्या मुख्य चौकात बिकानेर स्वीट समोर ४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक नितीन खैरे यांच्यावर त्यांचाच सख्खा भाचा प्रसाद सुनिल नलावडे याने डोक्यामध्ये दगडाने मारहाण केली. या मारहाणीत खैरे यांना गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या हाताची करंगळी तुटली होती. यानंतर खैरे यांच्या पत्नी निर्मला खैरे यांनी गुन्हा दाखल केला होता. यातील संशयित आरोपी प्रसाद नलावडे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.
या गुन्हयातील जखमी नितीन खैरे यांना वाय.सी-एम हॉस्पीटल, पिंपरी चिंचवड येथे उपचारसाठी दाखल केले असता घटनेच्या १८ दिवसांनी २२ मे रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या घटनेमुळे किरकोळ वादातून दोन कुटुंब उध्वस्त झाली आहेत. खैरे यांच्या मृत्यूने यवत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या गुन्हयात भारतीय न्याय संहितेचे कलम १०३ प्रमाणे खुनाचा वाढीव कलम लावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले आहे.