बेकायदा प्लॉटिंगचे पेव Pudhari
पुणे

Pune : पुरंदर तालुक्यात बेकायदा प्लॉटिंगचे पेव ! प्लॉटिंगमध्ये प्रशासन, राजकीय, धनदांडगे मंडळीच भागीदार?

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत

पुढारी वृत्तसेवा

सासवड : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. सासवड, जेजुरी शहराच्या चारही बाजूंच्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेले प्लॉटिंग धडाक्यात विकण्याचा प्रकार सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा धोका निर्माण झाला आहे. परंतु, मोठ्या राजकीय दबावामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

सासवड परिसरातील गावांच्या हद्दीत जमिनीचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे, संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनीवर विकास करणे अपेक्षित असते. परंतु, अनेक प्लॉटिंग अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रशासन गप्प का? हे न उलगडणारे कोडे आहे.

पुरंदर तालुक्यात नैसर्गकि स्रोत असणारे ओढे हे मुरूम, माती, दगड टाकून प्रवाहांना अडथळा ठरतील अशा रीतीने बुजविण्यात येऊन बेकायदा प्लॉट पाहून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या व धनदांडग्यांनी सुरू केला आहे. शेतजमिनीचे बेकायदा एका एका गुंठ्याचे प्लॉट पाडून विक्री होत आहे. यात महसूल विभागातील मंडळी देखील कायद्यातील पळवाटा शोधून अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. भाजप व शिवसेना महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये पुण्यासाठी पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. यानंतर पुरंदर तालुक्यात गुंतवणूक करण्यासाठी पुणे, मुंबई येथील गुंतवणूकदार व आजी-माजी नेत्यांनी विमानतळाचा फायदा घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.

रेखांकित जमिनीतील मोकळा भूखंड विकसित करून देणे, दिवा-बत्ती, जलनिस्सारण गटारांची व्यवस्था, आवश्यक रस्ते व संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकनधारकाची असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या बाबी समोर येत आहेत.

बेकायदा प्लॉटिंगला प्रशासनाची साथ

सासवड भागातील प्लॉटिंग दलालांनी प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून ओढ्यालगत जमीन, डोंगर, टेकड्या, वादावादी व वतनी, इनामी जमिनींचे प्लॉटिंग करणे चालविले आहे. अशिक्षित व गोरगरीब शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून तो प्लॉट चौपट, पाचपट दराने बेकायदेशीरपणे विक्री केला जात आहे आणि या दलालांना महसूल विभागातील मंडळी देखील लालसेपोटी कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत.

जमिनी धनाढ्यांना विकून एजंटांनी कमावले पैसे

मुंबई, पुणे येथील धनाढ्य लोकांनी शेतकर्‍यांच्या मजबुरीचा फायदा घेत कवडीमोल दराने जमिनी घेऊन त्यावर गुंठेवारी केली. सध्या गावागावातच जमिनीची खरेदी-विक्री करणारे एजंट तयार झाले. कमी कष्टात पैसे कमविण्यासाठी आपल्याच गावातील शेकडो एकर जमिनी धनाढ्य लोकांना विकून पैसे कमावले.

राजकीय प्रस्थ असलेले नेतेही सहभागी

या बेकायदा प्लॉटिंगमध्ये फक्त भू-माफियाच सहभागी नसून या भागातील मोठे राजकीय नेतेही सहहिस्सेदार आहेत. त्यामुळे येथे भरडला जाईल तो आयुष्याची पै पै जमा करून गुंतवणूक केलेला सामान्य ग्राहक. प्लॉट खरेदी करणार्‍या शेकडो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना चुना लागणार, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT