कळस : इंदापूर तालुक्यामध्ये माणसे राहत नाहीत तर काय जनावरे राहतात का? असा संतप्त सवाल रुई गावातील शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, खडकवासला कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
खडकवासला कालव्याचे पाणी शेतीसिंचनाला देण्याच्या मागणीसाठी रुई (ता. इंदापूर) येथील शेतकर्यांनी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बैठक घेतली. या वेळी खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी कालव्यामध्येच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. खडकवासल्याचे पाणी अद्यापही रुई गावापर्यंत आले नाही. जनावरांना व माणसांना पिण्यासाठी विहिरीमध्ये पाणी शिल्लक राहिले नसल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले.
यापूर्वी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पाणी सोडण्यात आले. परंतु, पाणी सोडण्याचा नुसता दिखावाच करण्यात आला. टेल टू हेड या पद्धतीने पाणी देणे गरजेचे असताना देखील पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. शेतीला तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी कालव्यातच धरणे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी अनिकेत लावंड, दादा पुणेकर, अण्णा ठोंबरे, सुरेश लावंड, गोपाळ सुर्वे, विष्णू मारकड, तानाजी मारकड यांच्यासह अन्य शेतकर्यांनी या बैठकीत केली.
गेल्या दीड महिन्यापासून इंदापूर तालुका खडकवासला कालव्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. कालव्यातून पाणी देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग स्पष्टपणे काणाडोळा करीत आहे.
इंदापूर तालुक्याला वगळून पाटबंधारे विभाग दौंड व बारामती तालुक्याला पाणी सोडण्यासाठी झुकते माप देत आहे. या तालुक्यातील वितरिका पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. याउलट इंदापूर तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून दौंड, बारामती, हवेली तालुक्यांना सुरू असलेले कालव्याचे पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत मिळत आहे. मात्र, या उलट परिस्थिती इंदापूर तालुक्यात आहे. येथील शेतकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.