पुणे

Pune : एनडीए चौक ओलांडण्यासाठी उभारणार पूल

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एनडीए चौकातील (चांदणी चौक) प्रकल्पाच्या मुळ आराखड्यात पादचार्‍यांचा विचार केला गेला नाही. पुलाच्या उद्घाटनानंतर या समस्येकडे 'दै. पुढारी'ने दि. १५ ऑगस्टरोजी पादचार्‍यांनी एनडीए चौक ओलांडायचा कसा?, असा मथळा असलेले सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पादचार्‍यांसाठी लोखंडी पूल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

एनडीए चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत ३९७ कोटी रुपये होती. हे काम पूर्ण होईपर्यंत एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. दि. १४ ऑगस्टरोजी 'दै. पुढारी'ने एनडीए चौकात केलेल्या पाहणीत महामार्ग ओलांडण्यासाठी पर्यायच नसल्याचे दिसून आले.

सातारा किंवा मुळशी भागातून पाषाण, कोथरूडकडे येण्यासाठी तर कोथरूड आणि पाषाण भागातील पादचार्‍यांना मुळशीच्या दिशेने जाण्यासाठी कोणतीही सोय नाही. या समस्येकडे 'दै. पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध करुन एनएचएआयचे लक्ष वेधले आहे.

एनडीए चौकात मोठा लोखंडी पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही बाजुच्या पादचार्‍यांना सहजपणे ये-जा करता येईल, असा आराखडा आहे. पादचार्‍यांची होणारी अडचण लक्षात घेऊन कमीत-कमी वेळेत हा पुल उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पादचार्‍यांचा विचारच केला गेला नाही…

बहुप्रतीक्षित एनडीए चौकातील प्रकल्पाचे केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार करणारी संस्था आणि प्रकल्प पूर्णत्वास नेणार्‍या अधिकाऱ्यांचा सन्मान केला. मात्र, या प्रकल्पात पादचार्‍यांचा कुठेच विचार केला गेला नाही.

जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नका

पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागते. असे करताना अपघाताची शक्यता अधिक आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यानुसार पाषाण ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे एनडीए चौकात नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये.

 – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पुणे

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT