तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका कंटेनरने 20 हून अधिक वाहनांचा अपघात केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (दि. 6) सायंकाळच्या सुमारास तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथे भरधाव व बेधुंदावस्थेत आलेल्या कंटेनरचालकाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
दिलीप सुभाष खोचरे ऊर्फ खोचरे मामा (वय 68, रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे, तर हनुमंत संभाजी भुजबळ (वय 37) व अश्विनी हनुमंत भुजबळ (वय 33, दोघेही रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीराम बाबूराव सांगळे (रा. दत्तनगर पाटस, ता. दौंड) या मद्यधुंद अवस्थेतील कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत हनुमंत संभाजी भुजबळ (वय 37, रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे हनुमंत भुजबळ हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने (एमएच 12 आरडी 9497) शिक्रापूरकडे येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनर (एमएच 42 बीई 9869)ने भुजबळ यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने समोरील आणखी एका दुचाकीला (एमएच 12 जेआर 6224) देखील जोरात धडक देऊन हा कंटेनर भरधाव तसाच पुढे गेला. पुढे एका फुलांच्या दुकानात कंटेनर शिरत असताना नागरिकांनी त्या कंटेनरचालकाला अडवत येथे उपस्थित कृष्णा गंभिरे या युवकाने शिताफीने कंटेनरची चावी काढून घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, संदीप कारंडे, पोलिस जवान ललित चक्रनारायण, योगेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली व संतप्त जमावातून कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
तळेगाव ढमढेरे येथे ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथे महाविद्यालय असून, परिसरात अनेक विद्यार्थी असतात. मात्र, नुकत्याच शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्याने येथे गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.