Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan  Pudhari
पुणे

99th Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास संमेलनगीत; पुण्यात प्रकाशन

साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीचा गौरव आणि मराठीच्या अभिजात दर्जाचे प्रतिबिंब असलेले गीत लवकरच साहित्यप्रेमींच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गेल्या काही संमेलनाचे वैशिष्ट्य ठरतेय ते संमेलनाचे गीत. सातारा येथे 1 ते 4 जानेवारीदरम्यान होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीही खास संमेलनगीत तयार करण्यात आले असून, माय मराठीचे विविध पैलूंपासून ते मराठीला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जापर्यंत... सातारा जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असो वा साहित्य संमेलनाचे विविध पैलू, याचे प्रतिबिंब असलेले हे संमेलन गीत संमेलनाच्या दरम्यान साहित्यप्रेमींना ऐकायला मिळणार आहे.

या गीताचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही संमेलनांमध्ये सर्वाधिक गाजले ते संमेलन गीत....दिल्ली येथे झालेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या गीतालाही साहित्यप्रेमींची दाद मिळाली होती. आता 99व्या साहित्य संमेलनासाठीचेही खास गीत तयार करण्यात आले आहे.

संमेलनगीताच्या प्रकाशन कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कार्यवाह सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशन या संमेलनाच्या आयोजक संस्था आहेत. यंदाचे साहित्य संमेलन शतकपूर्व असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर होणारे हे पहिलेच संमेलन आहे.

सातारा या स्वराज्याच्या राजधानीत संमेलन होत असल्याच्या निमित्ताने संमेलनाचे खास गीत तयार करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. सातारचे लेखक आणि रंगकर्मी राजीव मुळ्ये यांनी या गीताचे लेखन केले असून, सातारा येथील सुनील जाधव यांचे संगीत दिग्दर्शन आहे. विनल देशमुख आणि राजेश्वरी पवार यांनी हे गीत गायिले आहे.

सातारासारख्या ऐतिहासिक भूमीत 99वे साहित्य संमेलन होत आहे, हे वैशिष्ट्‌‍यपूर्ण आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रात होणारे हे पहिलेच संमेलन असून, असे वैशिष्ट्‌‍य संमेलनाला असल्यामुळे संमेलनगीत तयार करण्याची संकल्पना विनोद कुलकर्णी यांनी मांडली. गीत कोणकोणत्या विषयावर असावे, याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर मी गीत लिहिले. संमेलनगीत तयार करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.
राजीव मुळ्ये, संमलेनगीताचे लेखक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT