पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण मिळून अठरा वर्षांपुढील सर्व वयोगटातील 73 लाख 43 हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. म्हणजेच उद्दिष्टापैकी 88 टक्के नागरिकांनी दुस-यांदा लस घेतली आहे. तर 91 लाख 72 हजार जणांनी पहिल्यांदाच लस घेतली आहे.
पुणे जिल्हा लसीकरणाबाबत आघाडीवर आहे. त्यापैकी सर्वाधिक लसीकरण पुणे ग्रामीण भागात झाले आहे. पुणे ग्रामीणमध्ये पहिला आणि दुसरा डोस मिळून 67 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी 38 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस (107 टक्के), तर 29 लाख जणांना दुसरा (82 टक्के) मिळाला आहे. त्यापाठोपाठ पुणे शहरात 64 लाख लसीकरण झाले आहे. यापैकी 35 लाख (119 टक्के) लाभार्थ्यांना पहिला, तर 28 लाख (96 टक्के) जणांना दुसरा डोस मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण लसीकरणाची संख्या 32 लाख 93 हजार असून, त्यापैकी 17 लाख (99 टक्के) जणांना पहिला, तर 15 लाख (87 टक्के) जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात 18 ते 44 या वयोगटात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल 60 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, कोविड योध्दे, आरोग्य कर्मचारी आणि 45 ते 59 वयोगटात तुलनेने लसीकरणाचा टक्का कमी दिसून येत आहे. पुणे शहरात अपेक्षित लाभार्थी 30 लाख, पिंपरी-चिंचवडमध्ये 17 लाख आणि पुणे ग्रामीणमध्ये 35 लाख इतके आहेत.