पुणे

पिंपरी-चिंचवड शहरात 803 अनफिट स्कूल बस; फिटनेसकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सद्यःस्थितीत तब्बल 803 स्कूल बस या अनफिट असल्याचे उघड झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बससाठी निश्चित केलेल्या नियमावलीचा अवलंब देखील योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत आरटीओने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

बसची स्थिती हवी चांगली

विद्यार्थ्यांना चढता-उतरता येईल अशा पायर्‍या स्कूल बसला असायला हव्या. बसचे योग्यता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच बसची यांत्रिक स्थितीही चांगली असावी. शाळेची बस पिवळ्या रंगाची असावी. बस नोंदणी तारखेपासून पंधरा वर्षापेक्षा जास्त जुनी नसावी.

शालेय वाहनांसाठी नियमावली काय ?

वाहनचालकांकडे शालेय वाहतुकीचा परवाना गरजेचा
वाहनांची तपासणी केलेले योग्यता अर्थात फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक
बसमध्ये प्रथमोपचाराचे साहित्य असावे
वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर बसविण्यात यावे
प्रत्येक बसमध्ये पारिचारकाची सोय असावी
वाहनामध्ये अग्निशमन यंत्रणेची गरज

पालकांनी काय काळजी घ्यावी ?

आपला पाल्य ज्या बसने शाळेत ये-जा करतो त्याची फिटनेस तपासणी झालेली आहे की नाही, याची पालकांनी खात्री करून घ्यावी. त्या वाहनाची आसन क्षमता किती आहे, ते लक्षात घेऊनच पाल्याला व्हॅन किंवा बसने पाठवावे. बर्‍याचदा काही स्कूल बस आणि व्हॅनमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी बसविण्यात येतात. त्यामुळे मुलांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. स्कूल बसमधील मुलांची आसनक्षमता तपासण्याबरोबरच बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशा सुविधा आहेत का, याची तपासणी करायला हवी.

सर्व स्कूल बस चालकांकडे फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील माहितीनुसार 803 स्कूल बस अनफिट आहेत. त्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. कागदपत्रे नूतनीकरणासाठी बसचालक आणि शाळांचा कल वाढला आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेली स्कूल बस आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. शाळांनी स्कूल बस चालकांसमवेत कंत्राट करताना फिटनेस प्रमाणपत्र तपासुनच करावे.

– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT