बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी परतले स्वगृही | पुढारी

बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी परतले स्वगृही

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झालेले बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी घुमजाव करीत गावकरी मंडळात प्रवेश केला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आपला गैरसमज दूर केला. आता आपण गावकरी मंडळाबरोबरचं कायम स्वरुपी राहणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच साळवी यांनी दिली.

सरपंच साळवी यांनी आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याचे कारण सांगत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे काँग्रेस गोटातून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. काहींनी पेढे वाटले होते. परंतु, त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. तिसर्‍याच दिवशी सरपंच साळवी यांनी पत्रकारांसमक्ष गावकरी मंडळात पुन्हा प्रवेश करीत स्वगृही आल्याचे जाहीर केले.

सरपंच साळवी म्हणाले, भरत साळुंके व सुधीर नवले यांनी आपला बुद्धीभेद केला. तुमच्यावर अविश्वास आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे, असे भासविले. यामुळे गैरसमज झाल्याने आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु , वस्तुस्थिती समजताच चूक लक्षात आली. यामुळे पक्षांतराचा निर्णय मागे घेतल्याचे सरपंच साळवींनी स्पष्ट केले.

यावेळी जि. प. सदस्य शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी फोनवरुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे बोलणे करून दिले. ‘गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेवून जायचे आहे. बेलापूरच्या विकासासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहे,’ असे मंत्री विखे पा. विखे यांनी सांगताच, सरपंच साळवी यांनी आपला निर्णय बदलून स्वगृही परतल्याचे सांगितले.

‘मी गावकरी मंडळाबरोबरचं..!’

गावाच्या विकासासाठी मी गावकरी मंडळाबरोबरच असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी जाहीर केले. यामुळे गेल्या तीन दिवसांपासुन बेलापूर गावात सुरु असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाल्याचे अधोरेखित झाले आहे.

Back to top button