पुणे: गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे. वरिष्ठांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व राज्य राखीव पोलिस दलासह तब्बल आठ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच विशेष शाखेचे उपायुक्त
डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Pune News)
मानाच्या मंडळांच्या मिरवणूक मार्गांवर खडा पहारा असणार
विसर्जन मिरवणुकीत विशेषतः मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीच्या मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असणार असून, सीसीटीव्ही कॅमेर्यांचा सतत वॉच ठेवला जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मदत केंद्रे, वॉच टॉवर आणि चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभारण्यात येत आहेत. सोनसाखळी चोरी, खिसेकापू किंवा जबरी चोरी यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना पथकांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिणी पथके बंदोबस्तासाठी असणार आहेत. या वेळी लेझर लाईट्स किंवा घातक दिव्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, वैद्यकीय मदतीसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनाची सांगता होईपर्यंत शहर व उपनगरांमध्ये सतत पोलिस गस्त राहणार आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) व गृहरक्षक दलाचे जवानही या बंदोबस्तात सहभागी आहेत.
पुण्याची विसर्जन मिरवणूक ही परंपरेचा वारसा आहे. नागरिकांचा उत्साह अबाधित राहावा आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सज्ज आहे. सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून शिस्त राखावी.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर