

पुणे: सलग तिसर्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 880 रुपयांनी वाढून 1 लाख 6 हजार 970 रुपयांवर गेला आहे. गत सहा दिवसांत शुद्ध सोन्याच्या भावात चार हजार 900 रुपयांनी वाढ झाली आहे.
सराफी बाजारात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 800 रुपयांनी वाढून 98 हजार 50 रुपयांवर गेला आहे. गत सहा दिवसांत भावात 3 हजार 800 रुपयांनी वाढ झाली. चांदीच्या दरात गत सहा दिवसांत किलोमागे 6 हजार 900 रुपयांनी वाढ झाली आहे. (Latest Pune News)
तर, गणेशोत्सव आणि श्रावणी सणांमुळे चांदीची मागणी वाढली आहे. वाहन उद्योगासह औद्योगिक क्षेत्रातून मागणी वाढल्याने चांदीचा एका किलोचा भाव 1 लाख 27 हजार रुपयांवर गेला आहे.
वायदेबाजारातही गत सहा दिवसांत सोन्याच्या भावात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 1 लाख 6 हजार रुपये झाला आहे. व्यापार अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यामुळे एक सुरक्षित उपाय म्हणून, सोन्यातील गुंतवणूक वाढल्याने भाववाढ झाली आहे.