

विशाल शिर्के
पुणे: देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या 23 हजार 856 असून, त्यातील 3,728 स्टेशन्स महाराष्ट्रात आहेत. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या सर्वाधिक असणार्या राज्यात महाराष्ट्र दुसरे ठरले, तर रस्त्यांच्या लांबीच्या तुलनेत भारताचा क्रमांक देशात पाचवा लागतो.
केंद्र सरकारने देशातील एकूण वाहन विक्रीत 2030 पर्यंत 30 टक्के इलेक्ट्रिक वाहने असतील, असे धोरण निश्चित केले आहे. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार, फेब—ुवारी 2025 पर्यंत देशात नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 56.75 लाख आहे. भारतील रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केलेल्या बुलेटीननुसार देशातील सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंगची संख्या 23 हजार 856 आहे. (Latest Pune News)
देशात सर्वाधिक 6 लाख 36 हजार 887 किलोमीटर लांबीचे रस्ते महाराष्ट्रात आहेत. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सची संख्या महाराष्ट्रात आहेत. मात्र, 3 हजार 728 चार्जिंग स्टेशन्स असूनही रस्त्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा लागतो. महाराष्ट्राखालोखाल रस्त्यांची सर्वाधिक लांबी उत्तर प्रदेशात आहे.
येथील रस्त्यांची लांबी 4 लाख 42 हजार 907 किलोमीटर असून, चार्जिंग स्टेशन्सची संख्या 1 हजार 989 आहे. मध्य प्रदेशातील रस्त्यांची लांबी 3 लाख 65 हजार 45 किलोमीटर असून, ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची संख्या 903 आहे. आसाममधील रस्त्यांची लांबी 3 लाख 99 हजार 122 किलोमीटर असून, चार्जिंग स्टेशन्स अवघे 276 आहेत. राजस्थानमधील रस्त्यांची लांबी 3 लाख 13 हजार 469 किलोमीटर असून, चार्जिंग स्टेशन्सची संख्या 1 हजार 129 किलोमीटर आहे.
दिल्लीत चार्जिंग स्टेशनची घनता अधिक
राजधानी दिल्ली प्रदूषणाबाबतीत देशात आघाडीवर असलेले शहर आहे. हवेच्या घसरत्या गुणवत्तेमुळे दिल्लीत पर्यावरणपूरक वाहनपद्धतीला प्राधान्य दिले जात आहे. दिल्लीतील रस्त्यांची लांबी 16 हजार 170 किलोमीटर आहे. तर, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसंख्या 1 हजार 941 आहे. रस्त्यांच्या तुलनेत चार्जिंग स्टेशनची सर्वाधिक संख्या असलेले दिल्ली देशातील पहिले राज्य आहे.
हरित वाहन सुविधांत कर्नाटक अव्वल
देशात 23,856 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स असून, त्यातील सर्वाधिक 5,765 चार्जिंग स्टेशन्स कर्नाटकमध्ये आहेत. कर्नाटकातील रस्त्यांची लांबी 3 लाख 58 हजार 300 किलोमीटर आहे. रस्त्यांची सर्वाधिक लांबी असलेल्या राज्यात कर्नाटकचा क्रमांक पाचवा लागतो, तर रस्त्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची संख्या सर्वाधिक असणार्या राज्यात कर्नाटकचा क्रमांक देशात दुसरा लागतो.
इलेक्ट्रिक दुचाकीत भारत दुसरा
जागतिक इलेक्ट्रिक दुचाकींपैकी 78 टक्के चीनमध्ये असून, दुसर्या क्रमांकावर असणार्या भारताचा वाटा पाच टक्के आहे. जगात विकल्या जाणार्या 95 टक्के इलेक्ट्रिक कार चीन, युरोप आणि अमेरिकेत होतात, अशी माहिती आरबीआयच्या बुलेटीनमध्ये देण्यात आली आहे.