80 Corona patients in the maharashtra in month may
पुणे : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्यातही मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट होत आहे. मे महिन्यात आतापर्यंत 80 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले आहे. मात्र, कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरियंट सौम्य स्वरुपाचा असल्याने घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53 असून सर्व रुग्ण मुंबईतील आहेत. सध्या इतर जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. मे महिन्यामध्ये 80 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले असून, याआधी जानेवारीमध्ये 2, फेब्रुवारीमध्ये 1 आणि एप्रिलमध्ये 4 रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.
कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी पुन्हा महामारी येण्याची शक्यता नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. कोरोनाचा विषाणू नष्ट झालेला नसून, अधूनमधून डोकावत राहतो. सध्याचा व्हेरियंट सौम्य आहे आणि मृत्यूदर अल्प आहे. त्यामुळे कोरोना आजाराचे रुपांतर फ्लूसदृश आजारामध्ये झाले आहे.
एकूण : 5839 कोरोना चाचण्या : 87 रुग्ण
जानेवारी : 2278 कोरोना चाचण्या : 2 रुग्ण
फेब्रुवारी : 1452 कोरोना चाचण्या : 1 रुग्ण
मार्च : 792 कोरोना चाचण्या : 0 रुग्ण
एप्रिल : 644 कोरोना चाचण्या : 4 रुग्ण
मे : 673 कोरोना चाचण्या : 80 रुग्ण
21 ते 27 एप्रिल : 4
28 एप्रिल ते 4 मे : 3
5 ते 11 मे : 21
12 ते 18 मे : 56