

पुणे : रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत केडगाव रेल्वे स्थानकाचा विकास आणि आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. २२ मे २०२५ रोजी या स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी (दि.19) पुणे विभागातर्फे आयोजित दौऱ्यात माध्यम प्रतिनिधींना या विकासकामांची माहिती देण्यात आली.
केडगाव स्थानकावर प्रवाशांसाठी अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात नवीन १२ मीटर रुंद कव्हर ओव्हर फ्लॅटफॉर्म (COP) तयार करण्यात आला असून, रॅम्पच्या मदतीने सर्व प्लॅटफॉर्म जोडले गेले आहेत. प्रवाशांसाठी स्वतंत्र आगमन आणि निर्गमन प्रवेशद्वार, आकर्षक आणि सुधारित सर्क्युलेटींग व पार्किंग क्षेत्र, पारंपरिक वास्तुकलेतील सजावट, वातानुकूलित आणि बिगर-वातानुकूलित प्रतीक्षालय, दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष शौचालये, टॅक्टाइल पाथवे, डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि कोच गाइडन्स सिस्टम यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे.
"अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केडगाव स्थानकावर प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या नवीन सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होईल. येत्या 22 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या स्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे पुणे विभाग
नवीन १२ मीटर रुंद रूफ प्लाझा (COP)
रॅम्प व लिफ्टसह सर्व प्लॅटफॉर्म जोडले
सुधारित सर्क्युलेशन व पार्किंग क्षेत्र
दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
आधुनिक डिजिटल डिस्प्ले बोर्ड व कोच गाइडन्स सिस्टम