पोटगीवर अवलंबून असणार्‍या महिलांचे 70 ते 80 टक्के प्रमाण  File Photo
पुणे

Alimony after Divorce: पोटगी हाच घटस्फोटितांचा आधार; पोटगीवर अवलंबून असणार्‍या महिलांचे 70 ते 80 टक्के प्रमाण

मुलांच्या संगोपनास प्राधान्य; त्यापाठोपाठ नोकरीकडे सर्वाधिक कल

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे : परस्परसंमती तसेच एकतर्फी घटस्फोट घेऊन विभक्त झालेल्या तब्बल 70 ते 80 टक्के महिला या पोटगीवर अवलंबून असतात. त्याआधारे उदरनिर्वाह तसेच मुलांचे संगोपन करण्यास त्या प्राधान्य देतात. उर्वरित 30 टक्के महिला नोकरीचा मार्ग स्वीकारत स्वयंपूर्ण होत असल्याचे दै. ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे.

घटस्फोट हा परस्परसंमतीने असो की एकतर्फी, हा पती-पत्नीच्या जीवनातील सर्वांत कठीण काळ असतो. वैचारिक मतभेद, शारीरिक कमतरता, आर्थिक तसेच सामाजिक स्तर आदी विविध कारणे घटस्फोटांमधून दिसून येतात. शहरातील कौटुंबिक न्यायालयात सद्य:स्थितीत घटस्फोटांचे दावे दाखल होणाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याअनुषंगाने पाहणी केली असता शहरातील जवळपास 70 ते 80 टक्के महिलांचे पोटगी हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे.

अल्पशिक्षितांसह उच्चशिक्षितांमध्येही हीच परिस्थिती आहे. लग्नानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी, मुलांचे संगोपन हे महिलावर्ग मागे पडण्याचे प्रमुख कारण आहे. घटस्फोटानंतर सर्व जबाबदारी पार पाडत पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणे खडतर असल्याने महिलांकडून पोटगीचा मार्ग स्वीकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. तर, काही महिलांकडून पोटगी अपुरी पडत असल्याने नोकरीचा आधार घेतला जात आहे. लग्नामुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या महिलांकडून शिक्षण पूर्ण करण्याकडेही कल आहे. मात्र, हे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले.

...तिचा उदरनिर्वाह मिळणार्‍या पैशांवर

अनय आणि अनया (दोघांचीही नावे बदललेली) हे एका कंपनीत काम करीत होते. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर लग्नही झाले. दरम्यान, त्यांची कंपनी, कामाचे ठिकाण तसेच कामाच्या वेळाही बदलल्या. त्यात एक वर्षानंतर मुलगा झाल्याने अनया घरी राहिली. तर, अनयचे प्रमोशन झाले. त्याला वेगळ्या ऑफर येऊ लागल्या. अनयला नोकरीतील प्रगतीमुळे पुढे जाण्याची इच्छा झाली, तर अनयाला मुलाच्या पालनपोषणात अडकल्याने ती मागे पडली. यामध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाले. अखेर दोघांनीही परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अनय कामासाठी परदेशात गेला, तर अनया मुलाचे संगोपन करीत असून, तिचा उदरनिर्वाह पोटगीवर सुरू आहे.

लग्नानंतर बहुतांश उच्चशिक्षित तसेच अल्पशिक्षित पत्नी या मुलांचे संगोपन, कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यास प्राधान्य देतात. उच्चशिक्षितांमध्ये पती व पत्नी दोघेही कमावते असतात. मात्र, लग्नानंतर मुलांसह कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे पत्नी मागे पडते. या वेळी पतीला मोठे असल्याची भावना निर्माण होते, तर अशिक्षितांमध्ये कौटुंबिक कारणांवरून कलह निर्माण होतात. त्यातून न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात येतो.
अ‍ॅड. अजिंक्य मधुकर मिरगळ, फौजदारी व कौटुंबिक वकील

घटस्फोटानंतर महिला या गोष्टींना देतात प्राधान्य

  • मुलांचे संगोपन 40 टक्के

  • नोकरी 30 टक्के

  • गृहिणी 80 टक्के

  • शिक्षण 5 टक्के

घटस्फोटासाठी अर्ज करणार्‍या महिलांचे प्रमाण

वय व्यक्ती (दहा व्यक्तीमागे)

  • 18 ते 30 वर्षे : आठ ते दहा

  • 30 ते 40 वर्षे : सहा ते आठ

  • 40 ते 50 वर्षे : चार ते सहा

  • 50 ते 60 वर्षे: दोन ते चार

  • 60 वर्षांहून अधिक : एक ते दोन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT