

पुणे : राज्यात यंदा पावसाने मे महिन्यापासूनच जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर या जलजन्य आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत जलजन्य आजारांचे 1000 हून अधिक रुग्ण आढळून आले.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे दूषित पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा, उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न सेवन करू नये, असे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी उकळून व गार करून झाकून ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.
जोखमीच्या गावांची यादी तयार करणे
वर्षातून दोन वेळा हिरवे पिवळे व लाल कार्डबाबत सर्वेक्षण करण्यात येते. जोखमीच्या नसलेल्या गावांना हिरव्या रंगाचे तसेच मध्यम जखमीच्या गावांना पिवळ्या रंगाचे कार्ड देण्यात येते. जोखमीच्या ग्रामपंचायतींना लाल रंगाचे कार्ड देऊन साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येते.
पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईनमधील गळत्या शोधणे व दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
साथरोग नियंत्रणासाठी औषधाचा व इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा
पिण्याच्या पाण्याची नियमित जिल्हा राज्य आरोग्य प्रयोगशाळा मार्फत तपासणी करून शुद्ध पाणी पुरवठा करावा.
शौचाहून आल्यानंतर व जेवणापूर्वी हात
साबणाने स्वच्छ धुण्यात यावेत.
अतिसार, थंडी ताप आल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत.
हगवण, अतिसाराची, काविळची साथ
असल्यास पिण्याच्या पाण्यात क्लोरीन
लिक्विड टाकूनच प्यावे.
नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी.
नळ गळती, व्हॉल्व लीकेज असेल तर दुरुस्त करून टाकी सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये.
आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातुन एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळया पाण्यामधे होवू देऊ नये.