

Pune: हडपसर परिसरातील एका स्थानिक भाजप पदाधिकार्याच्या सदनिकेतून भरदिवसा चोरट्यांनी रोकड, सोने-चांदी आणि हिर्याचे दागिने असा 38 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घरातील सर्वजण तुळजापूरमध्ये देवदर्शनासाठी गेले असता चोरट्यांनी हा डल्ला मारला. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 14 जून रोजी पहाटे पाच ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
फिर्यादी महिला आणि कुटुंबीय हडपसर परिसरातील वैभव चित्रपटगृह परिसरात असलेल्या सेजल गार्डन सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (दि.14) पहाटे सदनिका बंद करून सर्व कुटुंबिय देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा फिर्यादींच्या सदनिकेचे लॉक तोडून आत प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने, हिरेजडीत दागिने, रोकड असा 38 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. देवदर्शनाहून सर्वजण घरी परतले तेव्हा त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. फिर्यादी महिलेने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.
बंडगार्डन रस्त्यावरील नारंगीबाग परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला नारंगीबाग परिसरातील नित्यानंद कॉम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस हवालदार जढर तपास करत आहेत.
तसेच मार्केट यार्ड भागतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी परदेशी चलन, 65 हजारांचे दागिने, मोबाइल असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील गणात्रा कॉम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून परदेशी चलन, दागिने, मोबाइल असा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.