पुणे

Pune news : धरणक्षेत्रात पावसाचा 7 वर्षांतील नीचांक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गेल्या सात वर्षांतील नीचांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या वरसगाव आणि पानशेत ही धरणे 100 टक्के भरली असली, तरी टेमघर धरण अद्यापही भरलेले नाही. खडकवासला धरण यंदाच्या हंगामात दोनदा 100 टक्के भरले. सध्या या धरणात 94 टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये दमदार पावसाने हजेरी न लावल्याने या धरणांमधून मुठा नदीत यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही करण्यात
आलेला नाही. शनिवारी (दि. 30)मान्सूनचा हंगाम संपला. सध्या राज्यातील मोसमी पावसाच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने राज्यात परतीचा पाऊस जेमतेम पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने गेल्या सात वर्षांचा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील धरणांचा आढावा घेतल्यानंतर यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सात वर्षांचा विचार करता, सर्वात नीचांकी पाऊस झाल्याचे समोर आले आहे.

चारही धरणे भरल्यावर मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. यंदा चारही धरणे भरलेली नसल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. सध्या उजनी धरणात केवळ 29.38 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 54.84 टक्के पाणीसाठा आहे.

दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे तीन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होत असतो. यंदा या धरणाच्या परिसरात केवळ अडीच हजार मि.मी. पाऊस झाला. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 5 ऑक्टोबरपर्यंत साधारण 2200 मि.मी. पाऊस होतो. यंदा दोन्ही धरणांच्या परिसरात अनुक्रमे 1642 मि.मी. आणि 1630 मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साधारण 750 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद केली जाते. यंदा या धरणाच्या परिसरात केवळ 585 मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे सध्या चारही धरणांत मिळून एकूण 28.32 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या सात वर्षांतील 5 ऑक्टोबरपर्यंतचा पाऊस
(मि.मीमध्ये)
वर्ष टेमघर वरसगाव पानशेत खडकवासला
2023 2568 1642 1630 585
2022 3427 2537 2538 770
2021 2986 1964 1983 622
2020 2810 2096 2206 991
2019 5001 3504 3521 1341
2018 4039 2222 2242 647
2017 3197 2286 2283 783

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT