तळेगाव ढमढेरे: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाटवस्ती येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सात बालकांना चावा घेतल्याची घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळच्या सुमारास घडली. या भटक्या कुत्र्यांची बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शिक्रापूर येथील जातेगाव रस्त्यालगत असलेल्या पाटवस्ती येथे अनेक भटके कुत्रे फिरत असून, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक एका काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने अंगणात खेळणार्या दीड ते चार वर्षे वयोगटातील सात बालकांना चावा घेतला. (Latest Pune News)
पिसाळलेल्या कुत्र्याने बालकांना चावा घेतल्याची माहिती गावात पसरल्याने नागरिक भयभीत झाले. पाटवस्ती भागातील घडलेल्या घटनेची माहिती सकाळी उशिरा मिळाली असून, आपण तातडीने कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याबाबतची उपाययोजना करीत असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले आहे.
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे मंगळवारी सायंकाळी श्वानदंश झालेल्या सात लहान बालकांना आणण्यात आले. या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.- डॉ. शहाजी कदम, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर