पुणे : राज्य शासनाने पुणे आरटीओ प्रशासनाला कळविल्यानुसार पुणे जिल्ह्यात सध्या 63 ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. हे 63 ब्लॅक स्पॉटचे प्रमाण खूपच जास्त असून, ते झिरो कधी होणार? असा सवाल पुणेकरांकडून प्रशासकीय यंत्रणांना विचारला जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार आरटीओने सर्वाधिक अपघात होत असलेल्या नगर रस्ता, सोलापूर रस्ता, शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी केली आहे. त्या वेळी त्यांना आढळलेल्या ब्लॅक स्पॉट आणि त्यावर काय काय उपाययोजना व्हायला हव्यात, यासंदर्भातील अहवाल तयार करून जिल्हाधिकार्यांना आणि संबंधित विभागांना दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील संबंधित विभागाने याबाबतच्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ब्लॅक स्पॉट कसा ओळखावा आणि प्रशासकीय यंत्रणा ब्लॅक स्पॉट कसा ठरवतात? असा प्रश्न पुणेकर वाहनचालकांना नेहमीच पडतो. यासंदर्भात दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, 500 मीटर लांबीच्या रस्त्यावर मागील तीन वर्षांत 5 अपघात किंवा 10 मृत्यू झाल्यास त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हटले जाते, असे त्यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा