सुनील जगताप
पुणे: महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या परंतु विनाअनुदानित असलेल्या तब्बल ४४ क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंना ग्रेस (गुणांक) गुण देण्याबाबत चक्क विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश देऊनही क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. ग्रेस गुणांच्या प्रस्तावाची फाईल केवळ अधिकाऱ्यांच्या टेबलावरच फिरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील हजारो खेळाडू ४४ विनाअनुदानित खेळप्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवूनही केवळ अनुदानाचा निकष नसल्यामुळे ग्रेस गुणांपासून वंचित राहत आहेत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
मात्र, सत्तेच्या आणि लालफितीच्या कारभारात धुंद झालेली ही नोकरशाही लोकप्रतिनिधींच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. उपाध्यक्षांच्या पत्रावर साधा निर्णय घेण्याची तसदीही या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. या दिरंगाईमुळे खेळाडूंचे भविष्य अंधारात चालले असून, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे शासन क्रीडा संस्कृती रुजवण्याचे ढोंग करते, तर दुसरीकडे क्रीडा विभागातील हेच अधिकारी कागदी घोडे नाचवून खेळाडूंच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत.
४४ विनाअनुदानित क्रीडा प्रकाराच्या ग्रेस गुणाबाबतची फाईल माझ्याकडे होती. या खेळाबाबतची टिप्पणी करून त्याचा अहवाल क्रीडा आयुक्तांच्या टेबलावर ठेवलेला आहे. आयुक्त याबाबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत.चंद्रशेखर साखरे (सहाय्यक संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)
४४ विनाअनुदानित खेळ प्रकाराबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बैठक घेऊन आठ दिवसांत माहिती पाठवण्याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु, अद्यापही अधिकाऱ्यांनी ही माहिती पाठवलेली नाही. उपाध्यक्षांच्या आदेशालासुद्धा अधिकारी केराची टोपली दाखवत असतील, तर खेळाडूंचे भविष्य कसे घडणार. यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्षांची पुन्हा भेट घेऊन कैफियत मांडणार आहोत.श्याम भोसले, राज्याध्यक्ष, शालेय खेळ क्रीडा संस्था