

पुणे: शहरातील अंधार दूर करण्यासाठी आणि रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था निर्माण करण्यासाठी तब्बल १६ हजार ६०३ नवीन विद्युत पोलची गरज असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. यामध्ये ८ हजार ९२ जुने व जीर्ण झालेले पोल बदलण्याची आवश्यकता आहे; तर निर्जन ठिकाणे, रस्तारुंदीकरणाची ठिकाणे, नियोजित रस्ते आणि नव्याने प्रकाशव्यवस्था आवश्यक असलेल्या ठिकाणी आणखी ८ हजार ५११ पोल उभारावे लागणार आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने पोल उभारण्यासाठी सध्या महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
एलईडी दिव्यांसाठी २१ कोटी २५ लाखांची तरतूद
२०२६-२७ या आर्थिक वर्षात एलईडी पथदिवे खरेदी करण्यासाठी महापालिकेकडे २१ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. या निधीतून सुमारे ३० हजार पथदिवे खरेदी करून शहरातील जुन्या पथदिव्यांच्या जागी ते बसविण्याचे नियोजन आहे. मात्र, हे दिवे बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या नवीन पोलसाठीच पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने एलईडी दिव्यांची खरेदी आणि प्रत्यक्ष उभारणी यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे.
क्षेत्रीय कार्यालयांच्या निधीतून उभारणार पोल
“शहरातील निर्जन आणि धोकादायक ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी १६ हजार विद्युत पोल उभारण्याचे नियोजन आहे. यापैकी ४ हजार ७०० पोल उभारण्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध झाली आहे. उर्वरित पोल क्षेत्रीय कार्यालयांच्या निधीतून उभारले जातील,” असे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले.
पथदिव्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली
महापालिका हद्दीत सध्या सुमारे १ लाख ८३ हजार ६८ विद्युत पोल असून, त्यावर २ लाख १० हजार ९८ पथदिव्यांची फिटिंग कार्यरत आहेत. शहरविस्तार, नव्याने विकसित होणारे भाग तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमुळे पथदिव्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार विद्युत विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीतून सुमारे ७ हजार २५ नवीन विद्युत पोल उभारण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनात जुने व जीर्ण पोल बदलणे, निर्जन ठिकाणी तसेच रस्तारुंदीकरण झालेल्या भागात पोल उभारणे यांचा समावेश आहे. यासोबतच सुमारे ६ हजार ९९५ नवीन पथदिव्यांच्या फिटिंग बसविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, प्रत्यक्ष गरज १६ हजार ६०३ पोलची असताना उपलब्ध निधीतून किती पोल उभारले जाणार? हा प्रश्न कायम आहे. विद्युत विभागाच्या अहवालानुसार, शहरातील ८ हजार ९२ पोल खराब अथवा जीर्णावस्थेत आहेत. हे पोल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निर्जन ठिकाणे, रस्तारुंदीकरणाची ठिकाणे, नियोजित रस्ते आणि नवीन प्रकाशव्यवस्था आवश्यक असलेल्या भागांसाठी ८ हजार ५११ नवीन पोलची गरज आहे. त्यामुळे खराब पोल आणि नव्याने आवश्यक असलेले पोल मिळून एकूण १६ हजार ६०३ पोलची आवश्यकता आहे. मात्र, या सर्व पोलसाठी सध्या कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.