पुणे

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभागाची 40 वैद्यकीय पथके

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा  श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात सोमवारी आगमन होत आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, रुग्णवाहिका, कीटकनाशक फवारणी अशी तयारी करण्यात आली आहे.

शहरात कमला नेहरू रुग्णालय, डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय, 18 प्रसूतीगृहे, 16 रक्तपेढ्या, 2 फिरते दवाखाने आणि 1 लसीकरण केंद्र अशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावरील सर्व खासगी दवाखान्यांमध्ये प्रत्येकी 10 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखीदरम्यान, 86 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सुविधांसह तैनात असतील.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 21 ठिकाणी, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 16 वैद्यकीय पथके उपलब्ध असणार आहेत.

यामध्ये 62 वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, 5 परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ 2, परिचारिका 40, फार्मासिस्ट 24, कर्मचारी 69 असे मनुष्यबळ असेल. प्रत्येक परिमंडळामध्ये 2 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी पथके प्रथमोपचारासह फुले नगर, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट वाकडेवाडी येथे सकाळपासून उपस्थित राहतील. वैद्यकीय पथके सासवड मुक्कामापर्यंत पालखीसह राहतील. भवानी पेठेतील रफी महंमद किडवई शाळा आणि नाना पेठ येथील नानासाहेब बडदे दवाखाना हे दवाखाने औषधोपचारांसाठी 24 तास सुरू राहतील.

आरोग्यसेवा दृष्टिपथात

वारक-यांसाठी कोरोना, डेंग्यू, चिकनगुनिया असे साथीचे आजार, तसेच सर्वसाधारण आजारांसाठी लागणारा औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
दोन्ही पालखी मार्गांवर मोफत औषधोपचार आणि वैद्यकीय पथके.
महापालिकेच्या 3, 108 क्रमांकांच्या 25 आणि खासगी 12 रुग्णवाहिका.
पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोकाट आणि भटकी कुत्री पकडण्यात येतील.
पालखी मार्गावरील मांस, मासळीची दुकाने पालखी कालावधीत बंद.
पालखी मार्ग, मुक्कामाचे ठिकाण, धर्मशाळा, मनपा शाळा, शासकीय कार्यालये येथे कीटकप्रतिबंधक औषध फवारणी.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT