Pune Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या आघाडीशी फारकत घेणार्या संभाजी ब्रिडने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. संघटनेने हे सातही उमेदवार पुणे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत दिले आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी ही माहिती दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनासमवेत दोन वर्षांपूर्वी युती केलेल्या संभाजी ब्रिगेड पक्षाने विश्वासात न घेता आघाडीकडून उमेदवारी डावलल्याने स्वबळाचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडने राज्यात स्वबळावर 35 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.
राज्यामध्ये शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाला संभाजी ब्रिगेडने पाठबळ दिले होते. ठाकरे गटासोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारही केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला काही जागा सोडाव्यात, अशी मागणी राज्याच्या पदाधिकार्यांनी लावून धरली होती. ठाकरे गटाकडून त्यांना काही जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना जागा देण्यात आल्या नाहीत.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांनी ठाकरे गटासोबत युती तोडत असल्याचे जाहीर करून राज्यात 50 हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मागील चार दिवसांपासून राज्यात संभाजी ब्रिगेडकडून गतिमान हालचाली करण्यात आल्या.
राज्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती देखील मागविण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत तब्बल राज्यात 35 उमेदवार उभे केले आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चंद्रशेखर घाडगे, दौंड विधानसभा मतदारसंघातून अविनाश मोहिते, पुरंदरमधून उत्तम कामठे, हडपसरमधून शिवाजी पवार, पर्वतीमधून अविनाश घोडके, खडकवासलामधून स्वप्निल रायकर, चिंचवडमधून अरुण पवार, बारामतीमधून विनोद जगतापस, अशा आठ उमेदवारांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून परशराम कुटे, राधानगरीमधून शहाजी देसाई, शाहूवाडीमधून सेवानिवृत्त कमांडर सदानंद मानेकर, सोलापूरमधून अॅड. देवेंद्र वाळके, तर हिंगोलीमधून प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या नावाचा समावेश आहे. प्रस्थापित व घराणेशाहीविरोधात आम्ही उमेदवार उभे केल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.