Maharashtra Assembly Polls | विदर्भातील एकंदर 62 जागांचा विधानसभा निवडणूक महासंग्रामात उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला. आता चार दिवसात थाटात फटाक्यांची आतषबाजी जोरात असणार आहे. कुणाचे फटाके फुटणार आणि कुणाचे फुसके ठरणार हे 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
नागपूर शहर व जिल्ह्यातील 12 मतदारसंघाचा विचार करता माजी मंत्री अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीचे तिकीट तर मिळवले मात्र अर्ज भरताना ते उशिरा पोहोचल्याने मध्य नागपुरात वंचित राहिले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेक मतदारसंघातून खासदार श्याम कुमार बर्वे व काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत आज नामांकन अर्ज दाखल केले. शिवसेना उबाठाने आधीच विशाल बरबटे यांना एबी फॉर्म दिला आहे. राजू पारवे यांनी देखील भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्या विरोधात बंड पुकारत अर्ज भरला आहे. काटोल मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख की सलील देशमुख या गोंधळात अखेर सलील देशमुख यांनी आईच्या साक्षीने नामांकन दाखल केले. पित्यासोबत शक्तिप्रदर्शन करताना काल त्यांचा अर्ज भरण्याची वेळ चुकली. या मतदारसंघात अजितदादा गटाचे सतीश शिंदे पवार गटात आल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी काँग्रेसचे माजी खासदार स्व.श्रीकांत जिचकार यांच्या पत्नी राजश्री जिचकार व पुत्र याज्ञवलक्य जिचकार यांनी अपक्ष नामांकन दाखल करीत राष्ट्रवादीची चिंता वाढविली आहे. कामठीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कसोटी आहे. उत्तर नागपुरात बसपाने काँग्रेसची चिंता वाढविली आहे. पश्चिममध्ये सामाजिक समीकरणावर काँग्रेसची भिस्त असणार आहे. पूर्व नागपुरात महायुती आणि आघाडी दोन्हीकडे बंडखोरी झाली आहे. दक्षिणचा तिढा सुटला असला रामटेक मतदारसंघाचा गुंता आघाडीत कायम आहे.