Baramati Politics: बारामती विधानसभा मतदारसंघात एकीकडे पवार काका-पुतण्यात घमासान सुरू असताना बिग बॉसफेम अभिजित बिचुकले यांनी बारामतीच्या राजकारणात उडी घेतली आहे. मंगळवारी (दि. 29) त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बारामतीत एकीकडे महायुतीचे उमेदवार अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार अशी जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यात आता बिचुकले यांची भर पडली आहे.
सातारच्या बिचुकले यांना राज्यभरातील जनता ओळखते. त्यांनी मराठी व हिंदी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. ‘शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो’, असे म्हणणारे बिचुकले आता बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीच्या लढतीची वेगळीच चर्चा पाहायला मिळणार आहे.
बिचुकले यांनी यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघातून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ते आता बारामतीतून आपले नशिब आजमावत आहेत. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतही बिचुकले यांनी उडी घेतली होती. तेथे त्यांना 47 मते मिळाली होती.
एकतर अजित पवारांवर कारवाई करा किंवा माफी मागा - बिचुकले
2014 च्या निवडणुकीत भाजप नेते देंवेद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना चक्की पिसायला लावू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी पवार यांच्यासोबत पहाटेच शपत घेतली. सिंचन घोटाळ्यात अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, नसतील तर तसे जाहीर करून त्यांची माफी मागा, अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केल्यावर माध्यमांशी बोलताना केली. बारामती शहर खूप सुंदर आहे. मला इथल्या जनतेने संधी दिली तर शरद पवारांपेक्षा चौपट विकास करून दाखवेन, असे ते म्हणाले.