रामदास डोंबे
खोर: युवकांनो, 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस हा झगमगत्या रात्रीत साजरा करण्याचा सर्वांत मोठा क्षण येऊन ठेपला आहे. हॉटेल, क्लब, रिसॉर्टमध्ये होणारा तुफान जल्लोष आणि त्यात हरखून गेलेली तरुणाई नववर्षाच्या स्वागतासाठी रंगलेल्या या रात्रीच्या तेजोमय प्रकाशात उत्साह, उमेद, आनंद आणि स्वप्नांची चमक दिसली जाणार आहे. पण, या चमकदार प्रकाशामागे एक काळी सावलीही उभी असते, हे देखील विसरू नका. कारण बेफिकिरी, नशा, उतावळेपणा आणि बेजबाबदारीची सरत्या वर्षाची रात्र ही नशा, मस्ती, धिंगाणा करून जबाबदारीची जाणीव हिरावू नका, तर नववर्षाची पहाट आनंदाची, सुरक्षिततेची आणि सजगतेची करण्याची ही वेळ आहे.
आजची तरुण पिढी आधुनिक, आत्मविश्वासू आणि ऊर्जावान आहे. त्यांच्या हातात भविष्य आहे; पण हाच उत्साह जर नियंत्रणाबाहेर गेला, तर आनंदाचे रूपांतर दु:खात होते. दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री अपघात, जखमा, जीवितहानी आणि कुटुंबांच्या डोळ्यात आलेले आसवांचे चित्र पाहायला मिळते. कारण, एकच उत्सव करताना जबाबदारी विसरली जाते. नववर्ष साजरे करणे चुकीचे नाही; उलट आनंद साजरा करायलाच हवा. पण, आनंद म्हणजे स्वैराचार नाही, वेगाची स्पर्धा नाही, नशेचा गर्व नाही. मद्यपान करून वाहन चालविणे ही शौर्याची नव्हे, तर मूर्खतेचे शिखर आहे. एका क्षणाच्या बेफिकिरीमुळे आपला जीव, मित्रांचा जीव, रस्त्यावर चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालणेही बरोबर नसून ते समाजद्रोहाचेच एक रूप आहे.
संयम हा कमजोरीचा नाही, तर उच्च संस्कारांचा आणि सशक्त विचारांचा परिचय आहे. आपला उत्सव इतरांच्या जीवनाशी जोडलेला आहे, याची जाणीव ठेवणे, हीच खरी प्रगल्भता आहे. पालकांचा विश्वास तुटू न देणे, कुटुंबाला काळजीत न टाकणे, सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हीच तर खरी नववर्षाची खूण आहे.
खरे नववर्ष म्हणजे मोठमोठ्या पार्ट्या आणि गोंगाट नव्हे. खरे नववर्ष म्हणजे स्वतःला दिलेले वचन, मी जबाबदार राहीन, मी जिवाचा सन्मान राखीन, मी समाजाचे ऋण मान्य ठेवीन, हे आहे. तरुणाईने ही जाणीव मनात रुजवली, तरच 31 डिसेंबरची रात्र केवळ रंगतदार नव्हे, तर अर्थपूर्ण ठरेल. आज समाज, पोलिस प्रशासन, कुटुंब आणि जाणते नागरिक एकच अपेक्षा व्यक्त करीत आहेत... उत्सव करा, आनंद साजरा करा, हसा-नाचाः पण ‘मर्यादा’ विसरू नका...!
कारण, 31 डिसेंबरची रात्र ही केवळ जल्लोषाची नसून जबाबदार भविष्यासाठीची कसोटी आहे. नववर्षाची पहाट आनंदाची, सुरक्षिततेची आणि सजगतेची व्हावी, हीच तरुणाईकडून समाजाची खरी अपेक्षा..!