पुणे

पुणे जिल्ह्यात श्रमदानातून 300 बंधारे पूर्ण; दहा हजार वनराई बंधारे बांधणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधले जात आहेत. ही मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. लोकसहभाग आणि श्रमदानातून आतापर्यंत 300 बंधारे बांधण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हवेली, पुरंदर आणि बारामती हे तीन तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत. इतर तालुक्यांमध्येही पाऊस समाधानकारक नाही.

त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात 50 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात पावसाची अनियमितता आणि पावसातील खंड, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण आणि पावसाचे दिवस कमी होत आहेत. काही तालुक्यांत सातत्याने पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊन पिकांच्या उत्पादनात घट होत आहे.

या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, भोरमधील रांजे गावात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी स्वत: श्रमदान केले आणि विविध बंधार्‍यांना नुकत्याच भेटी दिल्या. या मोहिमेला गती देण्यासाठी वनराई संस्थेकडून क्षेत्रीय अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT