पुणे: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 657 पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधला आहे. ही यादी राज्य सरकारला कळविण्यात आली आहे. यातील काही पुणेकर पर्यटकांनी माघारी परतण्यास सुरुवात केली असून, रविवारपर्यंत (दि. 27) 274 जण पुण्यात परतणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
अनेक पर्यटकांचे येत्या तीन दिवसांत रेल्वे आणि विमानाने माघारी परतण्याचे नियोजन असूनही अनेकांना पुण्यात परतण्याची घाई झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने परतण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटक करत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे म्हणाले, गुरुवारी (दि. 24) सायंकाळपर्यंत पर्यटकांची संख्या 657 इतकी झाली. ही सर्व यादी राज्य सरकारच्या मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागातून संपर्क केलेल्या सर्व पर्यटकांशी फोनवरून संवाद साधण्यात येत आहे. त्यांच्या परतण्याचे नियोजन लक्षात घेऊन त्यानुसार ते राज्य सरकारकडे कळविण्यात येत आहे.
याबाबत डुडी म्हणाले, राज्य सरकारने पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विमानांची सोय केली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यात विमानाने 11 प्रवासी पोहचले असून, आणखी 41 प्रवासी रात्री उशिरापर्यंत पोहचणार होते.
शुक्रवारी (दि. 25) 65 पर्यटक विमानाने आणि 19 पर्यटक रेल्वेने येणार आहेत, तर शनिवारी (दि. 26) 18 प्रवासी विमानाने व 34 पर्यटक रेल्वेने येणार आहेत. तसेच, रविवारी (दि. 27) 38 पर्यटक रेल्वेने व 41 पर्यटक खासगी गाड्यांनी येणार आहेत. मंगळवारी (दि. 29) सात जण विमानाने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून, माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
काही पर्यटकांचे येत्या तीन ते चार दिवसांत विमान किंवा रेल्वे परतण्याचे नियोजन असले तरी त्यापूर्वीच आमची परतण्याची सोय करावी, अशी मागणी पर्यटक करत आहेत. विमानाने परतण्याचे नियोजन झाले असले तरी रेल्वेने पर्यटकांना आणण्याचे नियोजन झाले नसल्याने पर्यटक काळजीत आहेत. काही पर्यटक मात्र नियोजित भ्रमंती पूर्ण करूनच परत येऊ, असे सांगत आहेत.