कात्रज/पुणे: कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास बालाजी रसाळ (वय 32, रा. लातूर), असे जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
जुन्या बोगद्यातून कात्रजच्या दिशेने हा ट्रक येत होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि भारती विद्यापीठ पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकास जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णवाहिकेमधून ससून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.
अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल वसंत भिलारे, विजय गोसावी, वाहनचालक बंडू गोगावले, उबेद शेख, किरण पाटील, अक्षय देवकर, मयूर काटे, प्रशांत कुंभार, केतन भोईर, मंगेश खंडाळे, अक्षय शिंदे, किशोर टकले, अन्वर शेख यांनी ट्रकचालकाला बाहेर काढले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे उपस्थित होते.