पुणे: ‘उपमुख्यमंत्री अजित पवार झिंदाबाद, अजित पवार आगे बढो, एकच वादा अजितदादा’, यासारख्या घोषणा देत ढोल-ताशांचा गजर करीत राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलात जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी राज्यभरातून आलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण क्रीडासंकुल परिसर गजबजून गेला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन मंगळवारी (दि.10) पुण्यात आयोजित केला होता. या वर्धापनदिनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Pune News)
सकाळपासून बस, कार तसेच विविध वाहनांतून पक्षाचे कार्यकर्ते बालेवाडीतील क्रीडा संकुलात जमण्यास सुरुवात झाली होती. क्रीडा संकुलात येणार्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जय्यत तयारी केली होती. वर्धापन दिनासाठी आलेलल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी भोजनाची व्यवस्था देखील संकुलाच्या आवारात करण्यात आली.
सकाळी 11 च्या सुमारास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. संकुलातील एका मैदानात हा सोहळा आयोजित केला होता. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आल्याने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.
उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे दुपारी 3 वाजता सभास्थळी आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. ‘अजित पवार तुम आगे बढो,’ ‘एकच वादा अजित दादा’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याने संपूर्ण सभास्थळ दणाणून गेले होते. अजित पवार आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर केला.
मोबाईल फोनचे टॉर्च लावून स्वागत
अजित पवार हे भाषण करण्यासाठी पोडियमवर आल्यावर सभागृहात उपस्थित सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी सर्वांनी मोबाईलचे टॉर्च लावून अजित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत भाषणाला सुरुवात केली.