

पुणे: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल व ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडीत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हे दोन्ही ठराव मांडले.
उपस्थितांनी दोन्ही हात वर करून या ठरावांना संमती दिली. भारताचे द्रष्टे नेते व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि गेल्या 11 वर्षांपासून अथक परिश्रम, दूरद़ृष्टी आणि समर्पित नेतृत्वाने भारताला प्रगती, समृद्धी आणि जागतिक सन्मानाच्या मार्गावर नेले आहे. (Latest Pune News)
या कालावधीत देशाने आर्थिक सुधारणा, सामाजिक समावेशकता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले. विशेषतः विकासकामांना प्राधान्य देऊन देशाला आत्मनिर्भर आणि सशक्त बनवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांना दृढ ठेवत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होत पंतप्रधान मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळकटी दिली.
पक्षाने आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण पायाभूत विकासकामांना व राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिले असून, राष्ट्रहित व राज्यहीत नजरेसमोर ठेवत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’सोबत राहुन वाटचाल करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत, असे तटकरे यांनी हा ठराव मांडताना स्पष्ट केले.
भारताचा जागतिक पातळीवर दबदबा
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे अभिनंदन करण्यात आले. पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत आपली राष्ट्रीय सुरक्षा सिद्ध केली.
यामुळे भारताचे सामर्थ्य जगासमोर ठळक झाले, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने एक नवीन मानदंड निर्माण केला. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणादायी व दूरद़ृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर धोरणांनी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वी झाले. यामुळे भारताच्या सामरिक धोरणांना आणि कठोर निर्णयक्षमतेला जगभरातून मान्यता मिळाली, ज्याने भारताचा जागतिक पातळीवरील दबदबा वाढवला आहे, अशी भावना आहे या ठरावात व्यक्त करण्यात आली आहे.