पुणे

अडीचशे जण गुन्हे शाखेच्या रडारवर : अनेक सोशल मीडिया अकाऊंटची पडताळणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समाजमाध्यमांवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्‍यांवर नजर ठेवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 250 हून अधिक सोशल मीडिया अकाऊंटची पडताळणी केली असून, 60 पेक्षा अधिक अकाऊंटवरील रील्स व कंटेंट डिलीट केले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रमुख 11 गुन्हेगारी टोळ्या आणि 21 'रायझिंग' टोळ्यांची पोलिस आयुक्तालयात परेड घेण्यात आली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ही गुन्हेगारांची शाळा घेतली गेली. यावेळी पोलिसांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी रील्स सोशल मीडियावर टाकू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील अशा प्रकारची रील्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी थेट ही रील्स टाकणार्‍या सोशल मीडियावरील अकाऊंटधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

पोलिस आयुक्तांनी टोळीप्रमुख गजा मारणे, बंटी पवार, नीलेश घायवळ, टिपू पठाण, बंडू आंदेकर, उमेश चव्हाण, बाबा बोडके, अन्वर ऊर्फ नव्वा, बापू नायर, खडा वसीम या प्रमुख 11 टोळ्यांसह सुमित चौधरी, मामा कानकाटे, योगेश लोंढे, जंगल्या पायाळ, सनी टाक, सनी हिवाळे, गणेश लोंढे, जीवन कांबळे, किरण थोरात, सौरभ शिंदे, कुणाल कालेकर, आकाश भातकर, अप्पा घाडगे, अनिकेत साठे, रोहित भुतडा, विद्या पाडाळे, अनिकेत जाधव अशा 'उदयोन्मुख' टोळ्यांच्या म्होरक्यांसह एकूण 267 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली होती. पोलिस आयुक्तालयाच्या रिंगणात उभे करून या गुन्हेगारांना खास पोलिसी भाषेत 'समज' दिली होती. यापुढे गुन्हेगारी कारवाया केल्या अथवा समाजमाध्यमात रील्स, व्हिडिओद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर 'खैर' नाही असा सज्जड दमच पोलिसांनी त्यांना दिला होता. पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत तर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेली रील्स शोधण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांकडून सोशल मीडियावरील वेगवेगळ्या अकाऊंट्सची पडताळणी केली जात आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांचे सोशल मीडियावरील अकाऊंट 'मॉनिटर' करण्यात येत आहेत. गुन्हेगारांची रील्स टाकणार्‍या अकाऊंट्सवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहेत. अशा प्रकारचे 250 हून अधिक अकाऊंट पोलिसांनी शोधून काढले असून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. तसेच गुन्हेगारांकडून 'गुन्हेगारीचे सोशल मीडियावर उदात्तीकरण करणे चुकीचे असून मी यापुढे कोणतीही रील्स टाकणार नाही, आपणदेखील टाकू नका' अशा प्रकारचे व्हिडिओदेखील तयार करून घेतले जात आहेत. यासोबतच आणखी जवळपास 150 अकाऊंट्सची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT