जुने-जाणते पुन्हा शरद पवारांच्या भोवती? | पुढारी

जुने-जाणते पुन्हा शरद पवारांच्या भोवती?

बारामती : पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी शरद पवारांच्या जवळ असणारे; परंतु त्यानंतर काही कारणांनी दुरावलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी शनिवारी (दि. 17) गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पुत्र व उद्योजक कुणाल जाचक हे होते. तत्पूर्वी, शुक्रवारी काटेवाडीत आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व जाचक हे त्यांच्यासोबत व्यासपीठावर होते. त्यामुळे बारामती-इंदापूरच्या राजकारणात आणखी बरेच काही घडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जुने-जाणते पुन्हा पवारांसोबत येतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. त्यामुळे खा. सुळे यांच्यापुढे आव्हान आहे. परिणामी, शरद पवार व सुळे यांनी आता बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. स्वतः शरद पवार हे बारामतीत तळ ठोकून आहेत. अजित पवार यांनीही प्रयत्न सुरू केला असून, शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत काही प्रवेश झाले. आता पवार पिता व कन्येजवळ हे दोन मातब्बर नेते दिसून आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

पवार यांच्याकडून भेटीचा निरोप आल्याने जाचक यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे समजते. जाचक व तावरे हे दोघेही सहकारातील अभ्यासू आहेत. अजित पवार यांच्याशी मात्र त्यांचे तितकेसे जमत नव्हते. याच कारणावरून माळेगाव व छत्रपती कारखान्यात अनेकदा रणकंदन झाले. पुढे मतभेदाची दरी रुंदावत गेली. हे दोघेही शरद पवार यांच्यापासून दुरावले. जाचक यांनी 2004 मध्ये शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली. तत्पूर्वी, तावरे यांनीही अजित पवार यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती.

हेही वाचा

Back to top button