पुणे

पिंपरीत सशस्त्र दरोडा! हातपाय बांधून 24 लाखांचा ऐवज चोरी

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मायलेकीचे हात-पाय बांधून 23 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेला. यातील धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यामध्ये वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिणी आणि इतर दोन साथीदारांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखली येथे घडली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. आरोपी महेश सुनार हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून कामाला आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी आणि तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यानंतर बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधून ठेवले. 'अगर मुँहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिर्‍याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 23 लाख 60 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच, जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT