पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'मला गेल्या 20 वर्षांत एकही चित्रपट करता आलेला नाही, ही सल माझ्या मनाला थोडीशी टोचत आहे,' अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केली. त्याआधी 30 ते 35 वर्षांच्या कारकिर्दीत मी भरपूर काम केले. मी कलाकृती करीत गेलो; पण मला त्याचा ढोल वाजविणे जमले नाही, असेही राजदत्त यांनी नमूद केले.
राजदत्त यांनी नुकतीच वयाची 90 वर्षे पूर्ण केली. जवळपास 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट केले. यानिमित्ताने मिती फिल्म सोसायटीतर्फे राजदत्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते राजदत्त यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले उपस्थित होते.
राजदत्त म्हणाले, 'दिवस-रात्र कष्ट करताना माणसाचे यंत्र होऊ नये, त्याला जगण्याचा आनंदही घेता यावा, यासाठी करमणूकप्रधान चित्रपटांची समाजाला गरज आहे. चित्रपटनिर्मितीतील तंत्रज्ञान कालनिहाय बदलत जाईल. पण, समाज सुदृढ आणि सक्षक्त ठेवण्यासाठी लोकांना खिळवून ठेवणार्या करमणुकीच्या चित्रपटांची निर्मिती होत राहिली पाहिजे. दिवसभर कामावरून थकूनभागून येणार्या माझ्या प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा, त्याची करमणूक होईल असा चित्रपट करायचा, हे मनाशी पक्के ठरविले होते.'
गोखले म्हणाले, 'राजदत्त यांचे व्यक्तिमत्त्व काजव्यासारखे आहे. ते ठरलेल्या वेळेला प्रकाश देतात, तर एरवी ते अंधारात असतात. मी त्यांच्यासोबत तीन चित्रपट केले. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो.' सहस्रबुद्धे म्हणाले, 'आज भाषिक चित्रपटाची व्यापकता वाढविण्यासाठी ती सबटायटल वापरून इतर भाषिक प्रेक्षकांना दाखविण्याची गरज वाढली आहे. मराठी चित्रपट आणि इचर भाषिक चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय परीघ गाठायला हवे.'
हेही वाचा