पुणे

अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीत 20 हजारांवर प्रवेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीत 20 हजार 607 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, त्यातील 8 हजार 109 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. आता प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. 326 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 14 हजार 350 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 96 हजार 634 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 76 हजार 152 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरला आहे. दुसर्‍या फेरीत त्यापैकी 20 हजार 607 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 109 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 4 हजार 316 विद्यार्थ्यांना दुसर्‍या, तर 2 हजार 538 विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आता कागदपत्रांची पडताळणी करून 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील त्यांच्या लॉग इनद्वारे 'प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन' हा पर्याय निवडून प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेशाची तिसरी फेरी 6 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रवेशात विज्ञान शाखेला डिमांड

अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या गुणवत्ता यादीत सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेसाठी जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी तब्बल 10 हजार 313 विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेत 7 हजार 766 आणि कला शाखेत 2 हजार 46 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT