पुणे

भीमाशंकरला 2 लाख भाविक; अधिक श्रावणच्या पहिल्याच सोमवारी पवित्रलिंगाचे घेतले दर्शन

अमृता चौगुले

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अधिक श्रावणात पहिल्याच सोमवारी (दि. 24) मंदिर पहाटे 4 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. 'हर हर महादेव'च्या जय घोषात शनिवारी सुमारे 2 लाख भाविक उपस्थित होते. अधिक श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावर्षी अधिक श्रावण असल्याने पहिल्याच दिवसापासुन मोठी गर्दी होत आहे. शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे व सोमवारी भाविक मोठ्या संख्येने आले होते.

मंदिर गाभारा व परिसरात बॅरिकेड्स, ताडपत्री असल्याने मंदिर ते पायरी मार्गात भर पावसात व दाट धुक्यात भाविक दर्शन रांगेत उभे होते. दर्शन बारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांना देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली होती. भीमाशंकरपासून अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर टेम्पो, मिनी बस व मोठ्या वाहनांसाठी 5 नंबर वाहनतळावर व्यवस्था करण्यात आली आहे, तर चारचाकी छोट्या गाड्यांसाठी वाहनतळ क्रमांक 3 व 4 येथे व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ क्रमांक 1 व 2 मध्ये मोटारसायकलची व्यवस्था केली आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

450 व्यावसायिकांचा चालतो चरितार्थ

भीमाशंकर येथील बेलफूल विक्रेते, डोलीवाले, हॉटेल, लॉज, माळा, रुद्राक्ष, वनस्पती औषधे आदी 450 व्यवसाय येथे आपला चरितार्थ चालवितात. यंदा सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय बरे होते. अधिक श्रावण यात्रेनिमित्त घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, किशोर वागज, निखिल मगदूम, 30 महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, 15 होमगार्ड तर वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत भाविकांना ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 15 मिनीबस, एसटीच्या बस 10 तर अशा एकंदरीत 37 बसगाड्या होत्या.

गळके छत पडण्याची भीती

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पायरी मार्गावरील छत अनेक ठिकाणी गळत असल्याने भाविक वृद्ध व लहान मुले भिजत होते. हे गळके छत पडण्याची भीती स्थानिकांसह भाविकांनी व्यक्त केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT