पुणे: भारतीय असल्याचे बनावट ओळखपत्र बाळगणार्या दोघा बांग्लादेशी महिलांसह त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्या एकास आंबेगाव पोलिसांनी अटक केली. लीझा मकबूल शेख ऊर्फ तस्लिमा, रिंकी देवी ऊर्फ खातून तमीना मकबूल मोरल आणि प्रमोद कुमार चौधरी (रा. नालंदा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
लीझा मकबूल शेख ऊर्फ तस्लिमा ही आंबेगाव खुर्द येथे राहण्यास होती. मात्र, ती वारंवार बांग्लादेशला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याबाबत तपास केला असता ती दुसरीकडे राहण्यास गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून तिचा माग काढला. आंबेगाव बुद्रुक येथील तिच्या नव्या पत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. (Latest Pune News)
तेव्हा तस्लिमासोबत तिची बहीण आणि तिचा नवरा राहत असल्याचे आढळून आले. दोघींनी आपापली नावे लीझा, रिंकीदेवी असल्याचे सांगितले. तसेच भारतीय असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट व इतर कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली.
मात्र, पोलिसांच्या पथकाने तस्लिमाच्या घराची झडती घेतली तेव्हा तिचा बांग्लादेशचा पासपोर्ट आढळला. त्यानंतर दोघी महिला बहिणी असून, बांग्लादेशी असल्याचे तपासात उघडकीस आले. तसेच रिंकीदेवी ऊर्फ खातून तमीना मकबूल मोरल हिने प्रमोद कुमार याच्याशी विवाह केल्याचे समजले. त्यानेच दोघींना बनावट ओळखपत्रे बनवून दिल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी तिघांविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक युवराज शिंदे, अंमलदार नीलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्निल शर्मा, पूजा खवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.