पुणे : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात कुपोषित व अतिकुपोषित बालकांचा शोध घेतला जात असून, बालकांना चार श्रेणीत विभागले जात आहे. त्यात कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित श्रेणीत आतापर्यंत दोन लाख 12 हजार 318 बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून एक हजार 289 बालके मध्यम कुपोषित, तर 371 बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहेत.
कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यात गर्भवती, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दोन लाख 12 हजार 318 बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून मॅम श्रेणीतील म्हणजेच मध्यम कुपोषित एक हजार 289 बालके आढळली आहेत, तर अतितीव्र कुपोषित श्रेणीतील 371 बालके आढळली आहेत. उर्वरित बालके निरोगी असल्याची माहिती समोर आली आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक यांचा समावेश असलेले पथक बालकांची तपासणी करीत आहे. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे; तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारांत त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजला जातो. त्यानुसार या बालकांची श्रेणी निश्चित केली जाते. अतितीव— कमी वजन असलेल्या बालकाला सॅम, तर मॅम बालक तीव— स्वरूपात कमी वजन असलेला असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीत किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येते.
''जिल्ह्यात बालकांची तपासणी केली जात असून, त्यातून मॅम आणि सॅम बालके आढळली आहेत. त्या बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार पुरविण्यात येणार आहे. अजूनही मुलांची तपासणी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आहारपुरवठा केला जाणार आहे.''
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे